किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
भौगोलिक स्थान : सध्याच्या रायगड जिल्ह्यात अक्षांस १८०, १४ व रेखांश ७३०, २०
वर समुद्रसपाटीपासून उंची - २८५१ फुट उत्तरेस व पूर्वेस काळ नदी , लिंगाणा किल्ला ,
दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा, आग्नेयेला राजगड, तोरणा,
पश्चिमेला गांधार नदी
कसे जायचे : मुंबई - पणजी महामार्गावर महाडवरून रायगड वर येण्यासाठी एसटी बस
व जीप सुटतात . तिथुन महाड ते पाचाड असा २५ किमी चा रस्ता आहे . पुढे चित दरवाजा पासून
पायऱ्या द्वारे महादरवाजातून गडावर प्रवेश मिळतो . किंवा पायर्यांकडून जो डांबरी रस्ता
पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने गेल्यास
नाना दरवाजाने आपण गड चढू शकतो.आता गडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून
५ ते १० मिनिटांत आपण गडावर पोहोचू शकतो.
रायगडाची इतिहासाला ज्ञात असलेली नांवे : १) रायरी २) रायगिरी ३) जंबुद्विप
४) राजगिरी ५) तणस ६) राशिवटा ७) नंदादिप ८) बंदेनूर ९) भिवेगड १०) रेड्डी ११) राहिर
१२) शिवलंका १३) रायगड १४) इस्लामगड १५) इंग्रजांनी कौतुकाने दिलेले नाव पूर्वेकडील
जिब्राल्टर
किल्ले रायगड वर्णन :
पम्पा मानसर आदि तलाब लागे
जेहिके परन मैं अकथ युग गथ के
भूषन यों साज्यो रायगढ सिवराज रहे
देव चक चाहि कै बनाए राजपथ के
बिन अवलम्ब कलिकानी आसमान मै है
होत बिसराम जहाँ इंदु औ उद्य के
महत उतंग मनि जोतिन के संग आनि
कैयो रंगचक हा गहत रविस्थ के
-कविराज भूषण
अर्थ : जेथे निवास करि रायगढी नृपाळ
पंपासरोवर समान सरें विशाल
तेथील राजपथ सुन्दर पाहुनी ते
आश्चर्य होई हृदयी सुरदानवांते
आधारहीन रविचन्द्र नभी फिरुनी
घेतात विश्राम इथें रथ थाम्बवूनी
येथील हर्म्यमणिमाणिक दीप्तियोगे
रक्तप्रभा वरिति ती रविची अथांगे
गडाचा थोडक्यात इतिहास : रायगडाला ज्ञात अज्ञात असा जवळ जवळ २००० वर्षाचा इतिहास
आहे . शिर्क्यांच्या कुलदैवत असलेल्या शिरकाई देवीचे वास्तव्य असलेल्या या गडावर ११
व्या शतकापासून यादवांची सत्ता होती . पुढे विजयनगर कडे ताबा - अल्लाउद्दीन शहा बहामनी
२राकडे ताबा -निजामशहा कडे ताबा -आदिलशाहकडे ताबा -पुन्हा निजामशहा कडे ताबा-पुढे परत
आदिल्शहा ची राजवट ,-पुढे बादशहा शहाजहान याची निजामशाहीवर स्वारी व विजय,-तहातून रायरीचा
प्रत्यक्ष ताबा चंद्रराव मोऱ्यांकडे. असे करत ६ मे १६५६ रोजी शिवरायांनी रायरी जिंकला
व गडाचे रायगड हे नाव ठेवले . इ स १६७० मध्ये गडावर नवीन बांधकाम व दुरुस्ती करण्यात
आली . पुढे रायगडावर घडलेल्या घटनांची घटनावळ पुढीलप्रमाणे आहे .
मे १६७२ - इंग्रज वकील उस्टिक रायगडावर.
२१ जुलै १६७२ - डच वकील आब्राहम लेपेकर रायगडावर.
३ जून १६७३ - इंग्रज वकील थॉमस निकल्स रायगडावर.
२२ मे १६७४ - हेन्री ऑक्झेंडनचे आगमन व १३ जुन पर्यंत मुक्काम.
२९ मे १६७४ - महाराजांची समंत्रक मुंज.
३० मे १६७४ - सोयराबाई साहेबांशी समंत्रक विवाह.
६ जून १६७४ - जेष्ठ शु. १३ शिवराज्याभिषेक.
१७ जून १६७४ - राजमाता जिजाऊसाहेबांचे पाचाड येथे निधन.
२४ सप्टेंबर १६७४ - अश्विन शु. ५ (ललितापचंमी) दुसरा राज्याभिषेक.
२४ सप्टेंबर १६७५ - इंग्रजवकील सॅम्युअल ऑस्टिन गडावर.
७ सप्टेंबर १६७५ - राजाराम साहेबांची मुंज.
१५ मार्च १६८० - राजाराम साहेबांचे लग्न.
३ एप्रिल १६८० - महाराजांचे महाप्रस्थान.
२१ एप्रिल १६८० - राजाराम साहेबांचे मंचकारोहण.
१८ जून १६८० - संभाजी राजांचे पन्हाळयाहून आगमन.
२७ जून १६८० - शिवपत्नी पुतळाबाई साहेब सती.
२० जुलै १६८० - संभाजी राजांचे मंचकारोहण.
२७ ऑक्टोबर १६८० - मोरोपंत पिंगळे यांचे देहावसन.
१६ फेब्रुवारी १६८१ - संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक.
ऑगस्ट १६८१ - संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न.
९ फेब्रुवारी १६८१ - राजाराम महाराजांचे मंचकारोहण.
२५ मार्च १६८९ - झुल्फिकार खानाचा रायगडाला वेढा.
५ एप्रिल १६८९ - राजाराम महाराज रायगडावरुन निसटले.
३ नोव्हेंबर १६८९ - गड मोगल्यांच्या हाती - इस्लामाबाद नामकरण.
इ.स. १६९० - मोगलांतर्फे गडाचा ताबा सिद्दीकडे.
६ जून १७३३ - रायगड पेशव्यांनी घेतला, ताबा पंतप्रतिनिधींकडे.
१८ मार्च १७७३ - रायगड पेशव्यांच्या ताब्यात.
जून १७९६ - नाना फडणविसांचा मुक्काम व गडाची डागडुजी.
इ.स. १८०२ - दुसऱ्या बाजीरावाचे गडावर वास्तव्य.
२ फेब्रुवारी १८१० - रायगड-माची येथे दुसऱ्या बाजीरावाचा मुक्काम.
इ.स. १८१६ - रायगड इंग्रजांकडे परंतु लगेच त्याचा ताबा पेशव्यांकडे, पेशवे गड सोडिनाच.
२५ एप्रिल १८१८ - इंग्रजांचा रायगडाला वेढा.
४ मे १८१८ - खुब लढयावर इंग्रजांचा भडिमार.
६ मे १८१८ - पोटल्याच्या डोंगराकडून केलेल्या भडिमाराने गडावर जाळपोळ.
१० मे १८१८ - रायगडावरील स्वातंत्र्यसुर्य मावळला तह होवुन गड इंग्रजांकडे.
रायगड वरील शिलालेख :
जगदीश्वरमंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो तो
पुढीलप्रमाणे, ’सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर
एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे:
श्री गणपतये नम: । प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते शिवस्यनृपते सिंहासने तिष्ठत :।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।
अर्थ: "सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी
राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण
केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा,
राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो."
रायगडाच्या घेऱ्यातील गावे :
१) मौजे वाळूसरे २) वाघोली ३) वाडी ४) वाघेरी ५) वारंगी ६) छत्री निजामपूर ७) बावले
८) सांदोशी ९) आमडोशी १०) कावले ११) करमर १२) खलई १३) पुनाडे १४) सारवट १५) नेराव १६)
पाचाड १७) कोंझर १८) मांगरुण १९) देवघर २०) नाते
गडावर पहावयाची ठिकाणे : पाचाडचा जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा
, महादरवाजा , मदारमोर्चा , कुशावर्त तलाव , होळीचा माळ , नगारखाना , पालखी दरवाजा
, व्याडेश्वर मंदिर , जगदीश्वर मंदिर , शिवसमाधी , नेताजी पालकर ,येसाजी कंक आणि मोरोपंत
पिंगळे यांच्या समाधी, बहुजन समाजातील महत्तरांचे वाडे , हनुमान टाके, गंगासागर तलाव
, हुजूरबाजार , दारूखाना , शिवरायांचा राजवाडा , राणीवसा , वस्त्रागार, कोषागार, सचिवालय
, बाळाजी आवजी चिटणीस यांचा वाडा, रत्नागार किंवा खलबतखाना, दासींची निवासस्थाने ,
पालखी दरवाजापाशी असलेले धान्याचे कोठार , गडावरील स्वयंपाकगृह, गडावरील बुद्धिवादी
कैद्यांसाठीचे कैदखाने, सरदारांची निवासस्थाने , चार राण्यांची निवासस्थाने , रायगडावरील
शौचकुपे, राजसभा, स्तंभ , मेणा दरवाजा, शिरकाई देवीचे देऊळ ,टकमक टोक, हिरकणी टोक,
राजांची टांकसाळ इत्यादी
गडावर जाण्यास लागणारा वेळ :दीड ते २ तास .
रहाण्याची व जेवण्याची सोय : रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी
खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एमटीडीसीच्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राह्ण्याची
सोय होऊ शकते. रायगड जिल्हा परिषद, तालुका महाड, जिल्हा रायगड अथवा महाराष्ट्र राज्य
पर्यटन केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई २१ यांच्याशी संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ
शकेल. पायथ्याच्या पाचाड गावी व गडावर श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन
(९५२१४५) ७४८४८, ७४८६६. गडावर स्थानिक धनगर वाडे आहेत . गडावर त्यांच्याशी संपर्क साधल्यास
त्यांच्या धनगर वाड्यात रहायची व जेवायची सोय होऊ शकते
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : समुद्रसपाटीपासून १०४० मी उंचीवर, पुण्याहून ८२ किमी अंतरावर
लोहगड वाडी गावाजवळ गायमुख खिंडी जवळ लोहगड आहे .
कसे जायचे : मळवली रेल्वे स्टेशन कडून भजे गावातून अथवा पवननगर कडून लोहगडावर
जाण्यासाठी मार्ग आहेत.
गडाचा थोडक्यात इतिहास : लोमेश ऋषींची स्थान असलेला लोहगड इसवी सन १४८९ मध्ये
बहामणी किल्लेदाराकडून जिंकून निजामशाही च्या ताब्यात . पुढे हा किल्ला आदिलशाही च्या
ताब्यात . पुढे इसवी सन १६५५-५६ मध्ये शिवरायांच्या ताब्यात . इसवी सन १६६५ मध्ये पुरंदराच्या
तहानुसार किल्ले लोहगड शिवरायांना औरंगजेबाला द्यावा लागला पुढे १६७० मध्ये शिवरायांनी
पुन्हा लोहगड जिंकला . पुढे संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर औरंगजेबाने हा किल्ला
१६९० मध्ये जिंकला . पुढे १७०४ मध्ये पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात . गडावर नाना फडणविसाच्या
काळात गडावर नवीन बांधकाम करण्यात आले . पुढे ४ मार्च १८१८ मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात
.
गडावर पहावयाची ठिकाणे : लोमेश ऋषींची गुंफा , विंचूकाटा माची, गणेश दरवाजा
, हनुमान दरवाजा , नारायण दरवाजा, महादरवाजा , लक्ष्मीकोठी, थडगी शिलालेख , थडगी, टाळदेव
इत्यादी स्थाने , तसेच गडाच्या मागच्या बाजूस सिंहगड , तुंग तिकोना , विसापूर हे किल्ले
दिसतात
गडावर जाण्यास लागणारा वेळ :लोहगडवाडीहून अर्धा तास लागतो . भाजे गावाहून २
तास लागतो.
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय स्वतःच
करावी . गडावर पिण्यासाठी पाण्याची टाकी आहेत . गडाच्या पायथ्याशी बरेचशी हॉटेल्स,
खानावळ आहेत.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : साधारण ३५ किमी अंतरावर भुलेश्वर डोंगर रांगेच्या उपरांगेत
नारायणपूर गावाजवळ समुद्रसपाटीपासून १३९० मी उंचीवर पुरंदर आहे.
कसे जायचे :पुरंदरच्या पायथ्यामार्फत पुण्याहून व सासवड हून एसटी बस ने नारायणपूर
गावात उतरायचे.
गडाचा थोडक्यात इतिहास : गडाची रचना राष्ट्रकुट यादव काळात झाली . पुनर्बांधणी
बहामनी काळात झाली . पुढे बरीदशाही, निजामशाही व आदिलशाही असा गडाचा प्रवास झाला .
शिवरायांनी १६४७ मध्ये गडाचा ताबा घेतला . १६६९ पर्यंत पुरंदरचा राजधानी म्हणून वापर
केला गेला . आदिलशाहीशी पहिले युद्ध हे पुरंदर वरूनच लढवले गेले . राजा जयसिंहाशी झालेला
ऐतेहासिक तह पुरंदरचाच. मुरारबाजीचे अतुलनीय शौर्य दाखवून दिलेले हौतात्म्य पुरंदरच्या
युद्धात झाले . छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरवरच झाला . पुढे पेशवाईत मराठ्यांकडे
गडाचा ताबा होता.
गडावर पहावयाची ठिकाणे : बुरुज , तटबंदी , मुरारबाजी पुतळा , तलाव , बालेकिल्ला
, पाण्याची टाकी , केदारेश्वर मंदिर , तसेच अनेक उत्तरकालीन अवशेष गडावर दिसतात.
गडावर जाण्यास लागणारा वेळ :पायथ्यापासून १ तासात गडावर जाता येते .
रहाण्याची व जेवण्याची सोय : स्वतःच्या खाण्याची सोय स्वतःच करावी लागते . सध्या
पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव
पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी
अंतरावर, , नसरापूर च्या पश्चिमेला २५ नीरा किमी अंतरावर, नसरापूर ते वेल्हे महामार्गावर
वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्यांच्या बे्चक्यात १३७६ मी . समुद्रसपाटी
पासून बिरमदेवाचा डोंगर उभा आहे . हीच आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी - राजगड.
राजगडाची इतिहासाला ज्ञात असलेली नांवे -
१) ब्रह्मदेवाचा डोंगर
२) बिरमदेवगड - यादव राजे
३) मुरबदेव - बुर्हाण - इ - मासीर
४) मुरूमदेव - १० डिसेंबर १६१६ मधील महजर
५) मुरुंबदेव - ९ मार्च १६२७ मधील कागद
६) मुसलदेव डोंगर -- इसवी सन १६४८-५२ - शेडगावकर बखर
७) राजगड - ४ सप्टेंबर १६५६
८) मुरब्गर - ५ जानेवारी १६६० मधील फर्मान
९) नबीशाह गड -- ६ फेब्रुवारी १७०४
१०) मुरम्बाद डोंगर - सभासद बखर
११) राजगिरी - शिवभारत
१२) शहामृग पर्वत - चित्रे शकावली
१३) दुर्जादेविचा डोंगर - चिटणीस बखर
१४) मुर्हार्ज्गड - छत्रपती शाहूकालीन यादी इसवी सन १७३९-४०
१५) राजनग - शिवकाव्य
१६) मुद्रोदेव
कसे जायचे :
१. बसने पुण्याहून वाजेघरार्यन्त …. नंतर वाजेघराहून पालीला जाणे . तिथुन निम्मा चढ
चढला कि दगडी पायर्यांनी थेट पाली दरवाजात पोहोचता येते .
२. वाजेघरहून पालीला न जाता सरळ पद्मावती माचीकडे चढनिस लागायचे . तासाभरात वरच्या
पठारावर असलेल्या बाबुदा भिकुल्याच्या झापावरून तिथल्या सोंडेवर स्वर व्हायचे व गडावरील
चोर दरवाजा गाठायचा . या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात
३ गुंजवण्याला लागून असलेल्या डोंगर धारेचा चढ चढून वरच्या पठारावर यायचे . तिहून बालेकिल्ल्याच्या
खालच्या अंगाला असलेल्या सोंडेवरून चढत तासाभरात गुंजवणे दरवाजा गाठणे .
४. भोरहून बसने मळे गावात उतरायचे . गावातून एक ठळक पायवाट राजगड कडे जाणार्या सोंडेवर
जाते . ह्या वाटेने जाताना धनगर वाडी लागते . तिहून पुन्हा सोंडेवर स्वर होऊन काळेश्वरि
बुरुजातील चोर दरवाजातून गडामध्ये प्रवेश करायचा .
५. पुणे -भुतोंडे बसने भूतोंद्यास उतरायचे . तिथून अळू दरवाजातून गडावर पोहोचता येते.
गडाचा थोडक्यात इतिहास : काळाच्या प्रवाहात आर्यावर्तातील ऋषीवरांची शिष्यपरंपरा
महाराष्ट्रात आली . त्यातील काहीजणांनी सह्यशिखरांवर आपली तपोभूमी निर्माण केली . इथल्या
आदिम जमातींना सृजनत्व दिले .त्यामुळे कृतज्ञते पोटी स्थानिक लोकांनी त्या सह्यशिखरांना
त्या ऋषींची नावे दिली . . त्यातील काही नवे जशीच्या तशीच तर काही अपभ्रंशाने लोकांच्या
तोंडी रुजली . जसे पराशर ऋषींचा पन्हाळा , कौडिण्य ऋषींचा कोंढाणा , वशिष्ठांचा वासोटा,
त्याच प्रमाणे ब्रह्मर्षीचा - बिरमदेवगड अर्थात राजगड होय . "गडांचा राजा , राजांचा
गड " म्हणून असलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावर महाराजांच्या आयुष्यातल्या
अभूतपूर्व घटना घडल्या. एकेकाळी विजय नगर साम्राज्याचा भाग असलेला हा गड चारहि मुस्लिम
शाह्यांनी मिळून केलेल्या विजयनगर च्या पडावानंतर मुस्लिम साम्राज्याचा कैदी झाला चित्रे
शकावली नुसार मावळ चे सरहद्दीत शहामृग ( निजामशहा आणि आदिलशहा या शहा नामे वाघांनी
विजयनगर साम्राज्य रुपी मृग होता त्याला आडवे पाडले असे दगडी उठावदार शिल्प ज्या पर्वतावर
आहे तो पर्वत निजामशाही व आदिलशाहीच्या सीमारेषेवर होता तेथे शिवाजी महाराजे यांनी
ठाणे घालून इमारत केली आणि राजगड नाव ठेवले .( २४ मे १६४२ ते २३ मे १६४३) सन १६६५ मध्ये
मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरुन
विलक्षण मारा केल्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर
तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये
राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून
निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७०
रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी
मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१- १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी
रायगड स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली. एप्रिल
१६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले.
संभाजी महाराजाना १६८९ साली पकडून ठार करण्यात आले . किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने
जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. मात्र अद्याप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता
पसरली नव्हती. त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली. आणि आपल्या बळावर राजगड
पुन्हा जिंकून घेतला. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेबाने स्वतः राजगडाजवळ गेला . पुढे
दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड
औरंगजेबाच्या हातात पडला आणि किल्ल्याचे नाव ‘नबिशहागड‘ असे ठेवले. २९ मे १७०७ रोजी
गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला
आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर
१७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था
लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती
खालावल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत.
गडावर पहावयाची ठिकाणे : संजीवनी माची , पद्मावती माची , म्यान दरवाजा , राज
दरवाजा , राणीवसा तलाव , तटसरनौबत सदर , सदरेखालील तळघर , तटसरनौबताचे घर , अंबरखाना
, कारकून फडाची जागा , महादेव टाके , पद्मावती मंदिर , महादेव मंदीर , बालेकिल्ला ,
ब्रह्मर्षी मंदिर, ब्रह्मर्षीउपासक गुहा, पद्मावती तलाव , प्रभाकर भट्टाचे घर, गुंजवणी
मार्ग तेहेळनि बुरुज , मोरोपंत पिंगळे यांचा वाडा , सोनापंत डबीर वाडा , सोनापंत डबीर
यांची समाधी , निळोपंत मुजुमदार वाडा , राजवाडा , जीजामातेचा वाडा , संपत्ती कोठारे
, सुवेळा माची , गजलक्ष्मी शिल्प , ब्रह्मर्षी शिष्य मूर्ती व कुंड , भागीरथी तीर्थ
, श्री जननी मंदिर , चंद्रकोर तळे , काळेश्वरी टाके इत्यादी.
गडावर जाण्यास लागणारा वेळ :साधारण ३ तास.
रहाण्याची व जेवण्याची सोय : सोनापंत डबीर यांच्या वाड्यात तसेच गडावरील पद्मावती
मंदिरात राहू शकतो . पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत. जेवणाची
सोय आपण स्वत: करावी. पद्मावती मंदिराच्या समोरच बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके
आहे.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : कानंद मावळ मध्ये वेल्हे गावाजवळ समुद्रसपाटीपासून १४०३ मी
उंचीवर प्रचंडगड अर्थात तोरणा हा गड आहे.
कसे जायचे :वाजेघर हून भिलवडे मेटाकडे जाणाऱ्या वाटेने तोरणा गाठता येतो . पण
ही वाट अवघड असल्यामुळे वेल्हे गावाहून जाणे श्रेयस्कर .
गडाचा थोडक्यात इतिहास : स्वराज्याचे पहिले तोरण शिवरायांनी प्रचंडगड घेउन बांधले
तोच हा तोरणा . दुरुस्ती करताना गुप्त धनाचा लाभ शिवरायांना झाला . याचा उपयोग राजगडाच्या
उभारणीत केला . पुढे औरंगजेब , नंतर पुन्हा मराठे , नंतर इंग्रज असा गडाचा प्रवास झाला.
गडावर पहावयाची ठिकाणे : गडाचा बिनी दरवाजा , कोठी दरवाजा , तोरणजाईचे मंदिर,
पाण्याची टाकी , मेंगाई मंदीर , झुंजार माची , दीपमाळ इत्यादी प्रेक्षणीय स्थाने गडावर
दिसतात.
गडावर जाण्यास लागणारा वेळ :अडिच तासात वेल्हे गावावरून गडावर जाता येते.
रहाण्याची व जेवण्याची सोय : वेल्हे गावात सुरेश कदम यांचे तोरणा विहार हॉटेल
आहे . तिथे चहा फराळ करता येईल . गावात मारुती मंदिर , वसतिगृह या ठिकाणी गावात सुद्धा
डेरा टाकता येईल . गडावर मेंगाई मंदिर मुक्काम योग्य आहे .
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : साधारण ३५ किमी अंतरावर भुलेश्वर डोंगर रांगेच्या उपरांगेत
नारायणपूर गावाजवळ समुद्रसपाटीपासून ६७५ मी उंचीवर वज्रगड स्थानापन्न आहे .
कसे जायचे : पुरंदरच्या पायथ्यामार्फत पुण्याहून व सासवड हून एसटी बस ने नारायणपूर
गावात उतरायचे.
गडाचा थोडक्यात इतिहास : रुद्रमाल हे उपनाम असलेल्या वज्रगडाची रचना राष्ट्रकुट
यादव काळात झाली . पुनर्बांधणी बहामनी काळात झाली . पुढे बरीदशाही, निजामशाही व आदिलशाही
असा गडाचा प्रवास झाला . शिवरायांनी १६४७ मध्ये गडाचा ताबा घेतला . आदिलशाहीशी पहिले
युद्ध हे पुरंदर वरूनच लढवले गेले . राजा जयसिंहाशी झालेला ऐतेहासिक तह पुरंदरचाच .
मुरारबाजीचे अतुलनीय शौर्य दाखवून दिलेले हौतात्म्य वज्रगड च्या युद्धात झाले . पेशवाईत
मराठ्यांकडे गडाचा ताबा होता.
गडावर पहावयाची ठिकाणे : बुरुज , तटबंदी , मुरारबाजी पुतळा , तलाव , बालेकिल्ला
, पाण्याची टाकी , केदारेश्वर मंदिर , तसेच अनेक उत्तरकालीन अवशेष गडावर दिसतात .
गडावर जाण्यास लागणारा वेळ : पायथ्यापासून १ तासात गडावर जाता येते.
रहाण्याची व जेवण्याची सोय : स्वतःच्या खाण्याची सोय स्वतःच करावी लागते . सध्या
पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मळवली रेवे स्टेशन च्या दक्षिणेकडे
विसापूर किल्ला आहे . १०८७ मी समुद्रसपाटी पासून उंच अशी विसापूरची उंची आहे.
कसे जायचे : :- मळवली रेल्वे स्टेशन कडून भजे गावातून अथवा पवननगर कडून लोहगडावर
जाण्यासाठी मार्ग आहेत.
गडाचा थोडक्यात इतिहास : इसवी सन १६८२ ला मराठे -मुघल युद्ध विसापूर किल्ल्याच्या
परिसरात झाले . पुढे ४ मार्च १८१८ मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात.
गडावर पहावयाची ठिकाणे : हनुमान मंदिर ,पाण्याची टाकी , बेलाग तटबंदी नजर खिळवून
ठेवते.
गडावर जाण्यास लागणारा वेळ : भाजे गावाहून अडीच तास लागतो.
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत. जेवणाची सोय
स्वतःच करावी . गडावर पिण्यासाठी पाण्याची टाकी आहेत.
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : रायगड
भौगोलिक स्थान : केळ्व्याच्या दक्षिणेला , दांडा काडीच्या मुखाशी आलिबाग च्या
समुद्रात कुलाबा किल्ला हा सागरी जलदुर्ग सर्जेकोटासोबत उभा आहे .
कसे जायचे : :- मुंबईहून पनवेल - वडखळ मार्गे अलिबाग ला येउन अलिबाग च्या समुद्रात
अर्धा किमी वर असलेल्या खडकावर बांधलेल्या किल्ल्यावर ओहोटी च्या वेळेत पाणी ओसरल्यावर
चालत देखील जाता येते . भरतीच्या वेळेत चारहि बाजूंनी हा गड पाण्याने वेढला जातो .
त्यावेळी गडावर बोटीने जाता येते . गडावर जाण्यासाठी भरती -ओहोटीच्या वेळा ठाऊक असणे
गरजेचे आहे . ओहोटीच्या या वेळा पुढील प्रमाणे आहेत .
तिथी वेळ तिथी वेळ
प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:००
द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३०
तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:००
चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:००
पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:००
षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:००
सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:००
पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:०० .
गडाचा थोडक्यात इतिहास : स्वराज्याच्या आरमाराची उभारणी करताना १९मार्च १६८०
शिवाजी महाराजांनी अलिबाग च्या समुद्रातील खडकावर एकावर एक चिरा रचून दुर्ग बांधणी
चा एक वेगळा प्रयोग कुलाबा किल्ल्यासाठी केला . शिवरायांच्या निधनानंतर इस. १६८१ मध्ये
महाराजांनी गडाचे काम पूर्ण केले . सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकिर्दीत प्रसिद्धीस
आला . ४ जुलै १७२९रोजी ह्यांचे किल्ल्यावर निधन झाले .इ. स. १७७० गडावर लागलेल्या भयंकर
आगीत गडावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली तर १७८७ मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्रे
ह्यांचा वाद नष्ट झाला . २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश - पोर्तुगीज ह्यांच्या संयुक्त
सैन्याने कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला . पण त्यांना यश आले नाही.
गडावर पहावयाची ठिकाणे : गडावर सर्जेकोट, प्रवेशद्वार , भवानी मंदिर, पद्मावती
मंदिर, गुल्वती देवी मंदिर, १७ बुरुज, वाडे पागा, कान्होजी अंग्रे यांचा वाड्याचे अवशेष
, यशवंत दरवाजा इत्यादी वास्तू गडावर आढळतात.
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर राहण्याखाण्याची सोय नाही . अलिबाग मध्ये
ती सोय होऊ शकते.
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : रायगड
भौगोलिक स्थान : मुरुड मध्ये शिरल्यावर एसटी स्थानकावरून पुढे जायचे . खाडीवरील
पूल ओलांडून राजापुरीच्या दिशेला निघायचे . वाटेत छोटी टेकडी लागते . तिथेच बोतीच धक्का
तिथे जंजिरा जलदुर्गावर जायला बोटी मिळतात.
गडाचा थोडक्यात इतिहास : पंधराव्या शतकात मुरुड किनारपट्टीवर निजामाची सत्ता
होती . व राजापुरीला कोळ्यांची वस्ती होती . राजापुरीचा त्यावेळी चांगला भरभराटीला
आला होता. . ह्या कोळ्यांना लुटारू आणि समुद्री चाचे ह्यांचा उपद्रव होत असे. ह्या
लुटारुंपासून संरक्षण करण्यासाठी कोळ्यांनी निजामाच्या ठाणेदाराकडून परवानगी घेऊन राजपुरीच्या
पाण्यातच प्रचंड खडकावर मेढेकोट म्हणजे लाकडी किल्ला तयार केला , ह्या कोळ्यांचा प्रमुख
कुणी राम पाटील होत. पुढे हा पाटील शिरजोर झाला . निजामी ठाणेदाराला जुमेनासा झाला
. पुढे पाटलाचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाने पिरमखान ह्या सरदाराला पाठवला . त्याने
कोळ्यांना व्यापारी असल्याचे भासवून मेढेकोटाला गलबते लाव्लि. सर्व कोळ्यांना रात्री
दारूचा नजराणा दिला . . सर्व कोळी दारू पिउन बेहोष झाले . त्याने सर्व कोळ्यांना जेरबंद
करून मेढेकोट ताब्यात घेतला आणि राम पाटलाचा बंदोबस्त केला . पिरमखानानंतर बुरहान खानाची
तिथे नेमणूक झाली . त्याने मेढेकोट पाडून १५६७ ते १५७१ या काळात दगडी कोट बांधून घेतला
. बुरहान खानाने किल्ल्याचे नाव किल्ले मेहरूब असे ठेवले . इ.स. १६१७ मध्ये सिद्दी
अंबरसात ह्याची या गडावर नेमणूक झाली . हाच जंजिराच्या नवाब घराण्याचा मूळ पुरुष .
शिवरायांनी हा गड घेण्याचा सहा वेळा प्रयत्न केला . पण त्यात अपयश आले . संभाजी राजांनी
हा हा प्रयत्न चालू ठेवला . श्रीरामसेतू प्रमाणे राजापुरी पासून जंजिरा किल्ल्यापर्यंत
दगडी पाण्यात रचून सेतू बांधण्याचा प्रयत्न केला . पण त्यावेळी औरंगजेबाने आक्रमण केल्याने
संभाजी राजांना सेतू अर्धवट टाकून माघारी यावे लागले . पुढे पेशव्यांनीही प्रयत्न केला
. पण त्यांनाही ते जमले नाही . जंजिरा अजिंक्यच राहिला . पुढे स्वतंत्र भारतात १९४८
साली जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले .
गडावर पहावयाची ठिकाणे : प्रवेशद्वार , शरभाचे शिल्प , रामपंचायतन , नवाबाच्या
वाड्याचे अवशेष , कोळीवाडा व इतर हिंदू शिल्पाचे अवशेष , नगारखाना , कलालबांगडी तोफ
,चावरी तोफ , लांडा तोफ , २२ बुरुज इत्यादी वास्तू गडावर दिसतात .
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर काहीही सोय नाही .
कालावधी : गड पाहण्यासाठी २ तास पुरेसे आहेत .
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : रायगड
भौगोलिक स्थान : मुरुड च्या सागरातील कासा बेटावर कासा उर्फ पद्मदुर्ग हा किल्ला
स्थित आहे .
गडाचा थोडक्यात इतिहास : १६६३ मध्ये शिवरायांनी जंजीरावर वचक ठेवण्यासाठी कासा
बेटावर पद्मदुर्गाची निर्मिती केली . पण सिद्दीने हा किल्ला राजांच्या कारकीर्दीतच
सागरी हल्ला करून हिसकावून घेतला .
गडावर पहावयाची ठिकाणे : बुरुजांनी युक्त असलेली तटबंदी, वाड्याचे पदके अवशेष,
बोट लागण्याचा धक्का , पाण्याची टाकी इत्यादी वास्तू गडावर दिसतात .
कालावधी : गड पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे .
जेवण्याची सोय : खाण्यापिण्याची सोय .
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : कोल्हापूर
भौगोलिक स्थान : कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर कोल्हापूर जिल्ह्यात समुद्रसपाटी
पासून ९५३ मि. एवढी उंची असलेला पन्हाळगड दिमाख्यात उभा आहे.
कसे पोहोचायचे : कोल्हापूर - पन्हाळा महामार्गावर बसने थेट पन्हाळ्यात जाता
येते .
थोडक्यात इतिहास : पराशर ऋषींच्या तपश्चर्येची जागा असलेला पन्हाळगड इ.स.पूर्व
तिसर्या शतकात प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याने बांधला . पूर्वी ब्रम्हदेवाने या
डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख "ब्रम्हगिरी ’ या नावाने होते .जे
नंतर मुस्लिमांनी बदलले शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी
होती. शिवरायांनी १६५९ मध्ये पन्हाळा जिंकल्यावर सध्याचे पन्हाळा हे नाव ठेवले .पुढे
हा गड विजापुरकरांनी जिंकला . इ. स . वि सन १६६० मध्ये अफझलखान वधानंतर पुन्हा हा गड
जिंकला . २ मार्च १६६० रोजी सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा टाकला . . चार महिने संपून
पावसाळा सुरु झाला तरी वेढा कडक होता . शेवटी १३ जुलै १६६० रोजी शिवरायांनी आपल्या
६०० मावळ्यांसह राजदिंडी मार्गे गड सोडला . आणि मग शिवा काशीद चे हौतात्म्य , पावन
खिंडीतील रण संग्राम , बाजीप्रभू व फुलाजी प्रभू यांचे बलिदान ह्या घटना घडल्या . पुढे
मोगलांनी १७०१ मध्ये हा गड जिंकला व नंतर १७०७ पुन्हा मराठ्यांनी हा गड जिंकला . १७०७
ते १७७२ या दरम्यान कोल्हापूर संस्थानाची राजधानी पन्हाळ्यावर होती . १८४४ मध्ये इंग्रजांनी
हा गड ताब्यात घेतला.
गडावर पहावयाची ठिकाणे : सोमेश्वर जलाशय , रामचंद्रपंत अमात्य व त्यांची दुसरी
पत्नी यांच्या समाध्या , संभाजी राजांचे देवूळ , सज्जाकोठी , पराशर गुहा , सादोबा देवालय
, राजवाडा, शाहूस्थापित शिवमंदिर , बाजीप्रभू बुरुज , वाघदरवाजा , पुसाटी बुरुज , बाजीप्रभू
व शिव काशीद यांचे पुतळे , बालेकिल्ला . अम्बारखाना . , अंधारबाव , महालक्ष्मी मंदिर
, धान्यकोठी इत्यादी . कोणास विशेष आवड असल्यास "पन्हाळगड ते विशाळगड" असा ट्रेक करून
वाटेतील मसाई पठार ,पावनखिंड पाहता येते.
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर राहण्याखाण्याची सहज सोय होते . गडावर बरीचशी
हॉटेल आहेत . गडावर बारमाही पाणी आहे.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : कोल्हापूर
उंची : समुद्रसपाटी पासून ९५३ मि.
भौगोलिक स्थान : कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर कोल्हापूर जिल्ह्यात समुद्रसपाटी
पासून ९५३ मि. एवढी उंची असलेला पन्हाळगड दिमाख्यात उभा आहे.
कसे पोहोचायचे : पन्हाळगडाचा जोडदुर्ग असलेल्या या गडावर कोल्हापूर - पन्हाळा
महामार्गावर बुधवार पेठ या गावातून जाता येते.
थोडक्यात इतिहास : शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला . राजपूत सरदार जसवंत
सिंह यांना जे किल्ले दिले गेले . त्यात ह्या किल्ल्याचा उल्लेख पन्हाळगडाचा जोडदुर्ग
असा न करता वेगळा किल्ला म्हणून केला गेला .
गडावर पहावयाची ठिकाणे : गडाचा बुरुज , गडावर पायऱ्यांची विहीर , मूर्ती नसलेली
मंदिरे, तुपाची विहीर म्हणून ओळखली जाणारी घुमटी . इत्यादी
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर राहण्याखाण्याची विशेष सोय नाही . ती सोय
जवळच्या पन्हाळगडावर होऊ शकते .
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
भौगोलिक स्थान : समुद्रसपाटी पासून ९०८ मी उंची असलेला लिंगाणा हा गड सह्याद्रीच्या
मुख्य रांगेला लागुनच महाड - बिरवाडी - पाने महामार्गावर आहे.
कसे पोहोचायचे : पुण्यातील वेळे येथून सिंगापूर च्या घाटाने अथवा बोरात नाळेने
लिंगन माचीला पोहोचता येते . ब्रिटिशांनी मराठ्यांवरील द्वेषापोटी गडावर जाणारी प्रत्येक
वाट उध्वस्त केली असली तरी रोप क्लायम्बिंग द्वारे गडावर चढता येते.तसेच महाड वरून
बसने पाने गावापर्यंत बसने पोहोचता येते.
थोडक्यात इतिहास : चंद्रराव मोरे यांच्या पाडावानंतर रायगड च्या बांधकामासोबत
शिवरायांनी लिंगाणा हा हि किल्ला बान्धल. १७८६ सालापर्यंत गडाच्या देखभालीचा खर्च रायगडाच्या
तिजोरीतूनच होत असे . गडाचा वापर वास्तू साठवण्याकरता गोदामाप्रमाणे व टेहेळणी साठी
केला गेला . रायगडाच्या संरक्षक किल्ल्यापैकी लिंगाणा हा हा किल्ला होता पुढे १८१८
ब्रिटिशांनी हा किल्ला पूर्ण उध्वस्त केला व सर्वांच्या विस्मरणात हा किल्ला जाईल याची
पुरेपूर काळजी घेतली.
गडावर पहावयाची ठिकाणे : धान्याच्या साठवणीसाठी गुहा , १९७९ साली गिर्यारोहण
करत असताना अपघाती मृत्यू पावलेले संतोष गुजर याचं छोटेसे स्मारक, पाण्याची टाकी ,
तुटक्या पायऱ्या गडावर दिसतात.
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर गुहेत ३०-४० जण राहू शकतात. पिण्यासाठी पाण्याचे
टाके आहेत . खाण्याची सोय स्वतःच करावी
गडावर जाण्या लागणारा वेळ : लिंगाणा हा गड चढावयास कठीण असल्यामुळे प्रत्येकाने
आपआपल्या क्षमतेनुसार गड चढण्यासाठी वेळ घ्यावा . अतिघाई किंवा अति वेळखाऊपणा इथे उपयोगाचे
नाही.
किल्ल्याचा प्रकार : किनारीदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
भौगोलिक स्थान : सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात विजयदुर्ग गावात वाघोटन
खाडीच्या मुखावर तीन बाजूंनी सागराचे पाणी व एका जमीन अश्या भौगोलिक परिस्थितीत विजयदुर्ग
हा किल्ला आहे .
कसे पोहोचायचे : बसने किंवा खाजगी वाहनाने तळेरे - विजयदुर्ग मार्गाने गडावर
पोहोचता येते. जैतापूर ला उतरल्यावर डांबरी रस्त्याने कुवेशी पिठ्गव्हाने मार्गे एका
तासात पांगेरे धक्यावर पोचायचे . या धक्याशेजारी दांड धक्का आहे . इथून समोर दिसतो
तो विजयदुर्ग .
थोडक्यात इतिहास : घेरिया हे उपनाव असलेल्या विजयदुर्गाची उभारणी शिलाहार राजांनी
केली . नंतर बहामनी- आदिलशाही असा गडाचा प्रवास झाला . १६६१ मध्ये शिवाजी राजांकडे
हा किल्ला आला . त्यांनी त्याची नव्याने बांधणी करून तो अत्यंत बळकट केला . आरमाराला
महत्व आल्यामुळे शिवकाळात विघोतन खाडीत विजयदुर्गापासून ३- ३.५ किमी गिर्ये येथे अंतरावर
गोदी बांधली , ती आजही वापरात आहे. पेशव्यांनी तुळाजी आंग्रे याचा इंग्रजांच्या मदतीने
१७५६ मध्ये पाडाव केला . त्याचा मोबदला म्हणून इंग्रजांनी बाणकोट सोबत विजयदुर्ग हि
आपल्यांकडे ठेवला . पुढे २ वर्षांनी पुन्हा पेशव्यांना तो परत केला . पुढे ह्या गडावर
धुळप कुटुंबियांचा अंमल होता . नंतर गडाचा ताबा ब्रिटीशांकडे गेला . इसवी सन १८९८ मध्ये
सूर्यग्रहणाच्या वेळी विजय दुर्गावर शास्त्रज्ञ लॉकियर याने सूर्यावरील हेलियम ह्या
वायूचा शोध लावला .
गडावर पहावयाची ठिकाणे : मारुती मंदिर , महाद्वार , किल्ले सदर , दारुकोठार
, जुने तोफगोळे, तटबंदी , धान्यकोठी , बुरुज इत्यादी गडावर पहावयास मिळतात .
रहाण्याची व जेवण्याची सोय : विजयदुर्ग गावात राहण्याखाण्याची सोय होऊ शकते
.
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग
जिल्हा : कोल्हापूर
भौगोलिक स्थान : : समुद्रसपाटी पासून १०२१ मि. उंचीवर असलेला विशाळगड सह्याद्रीच्या
मुख्य रांगेत स्थित आहे.
कसे पोहोचायचे : सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडलेल्या विशाळगडावर कोकणातील
साखरपा गावाकडून किंवा घाटावरील आंबा येथून जाता येते.
थोडक्यात इतिहास : दुसरा भोज राजा याने घाट मार्गाचे रक्षण करण्यासाठी जे किल्ले
बांधले . त्यापैकीच हा किल्ला . इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार याचे शिर्क्यांनी
आपल्या युक्तीने केलेले शिरकाण याच विशालगडाच्या परिसरातले.आहे . २ मार्च १६६० रोजी
सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा टाकला . . चार महिने संपून पावसाळा सुरु झाला तरी वेढा
कडक होता . शेवटी १३ जुलै १६६० रोजी शिवरायांनी आपल्या ६०० मावळ्यांसह राजदिंडी मार्गे
गड सोडला . आणि मग शिवा काशीद चे हौतात्म्य , पावन खिंडीतील रण संग्राम , बाजीप्रभू
व फुलाजी प्रभू यांचे बलिदान ह्या घटना घडल्या . सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला.
त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले
होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून
काढला व महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५०००
होन खर्च केले. या गडाला पूर्वी "खेळणा गड " असे हि म्हणायचे . संभाजी महाराजांनी विशाळगडावर
अनेक नविन बांधकामे केली. राजाराम महाराजांच्या कालावधीत विशालगड हा प्रमुख गड होता.
रामचंद्रपंत अमात्य यांनी विशालगड ला राजधानी चा दर्जा मिळवून दिला . ६ जून १७०२ मध्ये
गडाचा ताबा खूप मुश्किलीने औरंगजेबाकडे आला . १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा
जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनीधींना
दिला. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून तो उध्वस्त केला.
गडावर पहावयाची ठिकाणे : भगवंतेश्वर मंदिर, , पाताळदरी, , बाजीप्रभू देशपांडे
व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी , सरकारवाडा, राजाराम पत्नी अहिल्याबाई चे वृंदावन
, गोपाळ तळ व चंद्र तळे , राजवाडा, टकमक टोक, मुचुकंद गुहा इत्यादी.
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर राहण्याखाण्याची सोय आहे . गडावर बरीचशी
हॉटेल आहेत . गडावर बारमाही पाणी आहे .
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : : ३५०० फुट उंची असलेला शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील
नाणेघाट डोंगर रांगेत जुन्नर शहरात शिवनेरी हा किल्ला आहे.
कसे पोहोचायचे : १) जुन्नरला येताना माळशेज घात पार केल्यानंतर गणेश खिंडी तून
शिवनेरी किल्ल्यापर्यंत जाता येत. या मार्गाने गडावर जाण्यास १ दिवस लागतो .
२) जुन्नर शहरात शिरल्यानंतर शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या डांबरी रस्त्याने चालत
गडाच्या पायथ्यापाशी आपण येउन पोहोचतो. यावाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास लागतो .
३)शिवपुतळ्यापासून डांबरी रस्त्याने चालत जात असताना रस्त्याच्या उजव्या कडेला मंदिर
लागते . मंदिरासमोरील वाट आपल्याला कातळ भिंतीपाशी नेउन सोडते . पुढे भिंतीला लावलेल्या
साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पायऱ्याच्या साह्याने वर पोहोचता येते . ह्या
वाटेने पाऊन तास लागतो.
थोडक्यात इतिहास : गडाचा इतिहास सातवाहन काळापासून चालू होतो. नाणेघाट ह्या
पुरातन व्यापारी मार्गावर ठेवण्यासाठी दुर्गांची निर्मिती करण्यात आली . सातवाहन काळानंतर
राष्ट्रकुट , चालुक्य या राज्सात्तेखालील शिवनेरी होता . ११७० ते १३०८ याकाळात शिवनेरीवर
यादव घराण्याची सत्ता होता त्यानंतर १४४३ मध्ये बहामनी सरदाराने हा किल्ला घेतला .
१५९५ साली हा किल्ला मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आला . जिजामाता गरोदर असताना
जाधव रावांनी तिला शिवनेरीवर नेले . शके १५५६ वैशाख शुद्ध पंचमी तिथीला जिजाबाई प्रसूत
झाल्या . गडावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले . १६३७
साली हा गड मोगलांच्या ताब्यात गेला . १६५० साली मोगलांनी हजारो कोळी सैनिकांची डोकी
उडवली . पुढे १७१६ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला मराठे शाहीत आणला . पुढे १८१८ नंतर
हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.
गडावर पहावयाची ठिकाणे : गडावरील सात दरवाजे, शिव जन्मस्थान , शिवमंदिर , अंबरखाना
, कोळी चौथरा , कडेलोट टोक ,हमामखाना इत्यादी वास्तू गडावर पहावयास मिळतात.
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर शिवकुंज ह्या वास्तू मागे वर्ह्यांडा मध्ये
१० जणांची राहण्याची सोय होऊ शकते . गडावर जेवणाची सोय नाही . त्यामुळे ती व्यवस्था
स्वतःच करावी . पिण्यासाठी गंगा व जमुना टाक्यांमध्ये पाणी आहे .
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
भौगोलिक स्थान : : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण गावच्या समुद्रकिनारी कुरटे बेटावर
सिंधुदुर्ग हा किल्ला आहे .
कसे पोहोचायचे : बसने किंवा खाजगी वाहनाने मालवणला पोहोचून मच्छीमारांच्या बोटी
जिथे लागतात तुथून एक होडी ठरवून किल्ल्याकडे निघायचे .
थोडक्यात इतिहास : "चौऱ्यांशी बंदरी ऐसी जागा नाही " असे जाणून शिवरायांनी कुरटे
बेटावर २५ नोव्हेंबर , १६६४ साली " मोरयाचा धोंड " नावाच्या दगडावर भूमीपूजन करून गडाच्या
कामास सुरुवात केली . २९ मार्च १६६७ साली बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज स्वतः
गडावर उपस्थित होते . ५०० पाथरवट , २०० लोहार , १०० गोवेकर पोर्तुगीज आणि ३००० मजूर
यांनी ३ वर्षे खपून गड पूर्ण केला . गड पूर्ण होण्यास ३ वर्षे पूर्ण ;लागली . राजाराम
महाराजांच्या मृत्युनंतर १७०० साली ताराबाईने मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले . शाहू
व ताराबाई मध्ये झालेल्या करारानुसार सिधुदुर्ग ताराबाईच्या नियंत्रणाखाली आला . पुढे
हा गड ब्रिटीशांच्या ताब्यात गेला .
गडावर पहावयाची ठिकाणे : गडावर गड बांधण्यापुर्वीचा भूमीपूजनाचा मोरया धोंड
, गडाचा गोमुखी दरवाजा , बुरुज , जरीमरीचे मंदिर, ढासळत चाललेली तटबंदी , शिवराजेश्वर
मंदिरातील नावाड्याच्या वेशात असलेली शिवरायांची बिनदाढीची मूर्ती , , गोड्या पाण्याच्या
विहिरी, शौचकुपे इत्यादी .
रहाण्याची व जेवण्याची सोय : मालवणला राहण्याखाण्याची सोय होऊ शकते . गडावर
हॉटेल्स नाहीत .
गडावर जाण्यास लागणारा वेळ : मालवण हून बोटीने गडावर जाण्यास १५-२० मिनिटांचा
कालावधी लागतो .
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
जिल्हा : पुणे
भौगोलिक स्थान : : पुण्याच्या नैऋत्येस ३० किमी अंतरावर भुलेश्वरच्या डोंगर
रांगेवर कोंढाणा हा किल्ला आहे . तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर शिवारायांनी गडाचे
नाव सिंहगड असे ठेवले . याची उंची समुद्र सपाटीपासून ४३२२ मी आहे . कसे जायचे :- गडावर
जाण्यासाठी पक्का रस्ता झालेला असल्यामुळे गडावर खाजगी गाडीने जात येते . स्वारगेट
वरून पुणे महानगर पालिकेच्या बसेस गडाच्या पायथ्याशी असलेल्या हातकरवाडी पर्यंत जाता
येते . नंतर मळलेल्या पाउलवाटेने गडावर जाता येते . तसेच कोंढणपूर ला उतरून कल्याण
गावातून कल्याण दरवाजातून गडावर जाता येते . तसेच खडकवासला धरणाच्या मार्गाने तीन दरवाजे
पार केल्यानंतर गडावर प्रवेश करता येतो .
थोडक्यात इतिहास : प्राचीन काळी कौडिण्य ऋषींचे स्थान असलेल्या कोंढाणा गडाचा
उल्लेख गणेश पुराणांत चिंतामणी अवताराच्या कथेत आलेला आहे . गडाचा इतिहासात ठळक उल्लेख
आला तो १६७० साली झालेली तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे . मुघल सरदार उदयभान राठोड
व तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांत मार्च १६७० साली घनघोर युद्ध झाले . स्वताच्या
मुलाच्या लग्नाला प्राधान्य न देता तानाजी मालुसरे यांनी स्वराज्याच्या कार्यास प्राधान्य
दिले . घोरपडीच्या सहाय्याने तानाजी व मावळे सिंहगडावर चढले अशी आख्यायिका आहे . या
युद्धात तानाजी पडले पण सुर्याजींनी बाजी सावरून धरली व युद्ध जिंकले . तानाजींचे हौतात्म्य
मराठी साम्राज्याच्या इतिहासातील मानबिंदू ठरले . ३० मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम
महाराजांचे निधन सिंहगडावर झाले . लोकमान्य टिळक विश्रांतीसाठी व अवकाशनिरीक्षणासाठी
सिंहगडावर राहायला येत.
गडावर पहावयाची ठिकाणे : श्री कोंढाणेश्वर शिव मंदिर , श्री अमृतेश्वर भैरव
मंदिर , नरसिंह मंदिर, रामकडा , कल्याण दरवाजा , पुणे दरवाजा, म्हसोबा , उदेभानाचे
स्मारक , तानाजीचे स्मारक, राजारामाचे स्मारक , झुंजार बुरुज,टिळक बंगला इत्यादी .
रहाण्याची व जेवण्याची सोय : गडावर रहाण्यासाठी सोय नाही. जेवणाची सोय गडावरील
हॉटेल्स मध्ये होऊ शकते. गडावर पिण्यासाठी पाण्याची टाकी आहेत.
गडावर जाण्यास लागणारा वेळ : पायथ्यापासून २ तास लागतात .